लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या कोरोना उपचार मिळताना नागरिकांना अनेक अडीअडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी भाजपच्या वतीने टीम तयार करण्यात येणार असून, ते नागरिकांना मदत करणार आहेत.
भारतीय जनता पक्ष जिल्हा ग्रामीणची रविवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत या विषयांवर चर्चा करून समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काय उपाययोजना करता येईल या संदर्भात जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. ही टीम कोरोनासंदर्भात असलेल्या अडचणी, बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शनसंदर्भात काम करणार आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे. जनतेने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
१४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष संपूर्ण जिल्हाभरात मेणबत्त्या व प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
बैठकीला जिल्हाध्यक्ष आमदार भोळे यांच्यासह खासदार रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील उपस्थित होते.