आमदार सुरेश भोळे अजिंठा विश्रामगृहावर ठाण मांडून; पदाधिकारी व नगरसेवकांसोबत बैठकांचे सत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऐन निवडणुकीच्या वेळेस गायब झालेल्या भाजपच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. सोमवारी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी गायब झालेल्या काही नगरसेवकांशी चर्चा केली असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. त्यापैकी काही नगरसेवकांची नाराजी दूर झाली असल्याचा दावाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, आमदार सुरेश भोळे सोमवारी संपूर्ण दिवसभर अजिंठा विश्रामगृहावरच ठाण मांडून होते. तसेच त्यांनीही काही नगरसेवकांशी संपर्क साधला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार सुरेश भोळे हे कोरोनावर मात करून शनिवारीच शहरात परतले. त्यातच महापौर निवडीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये झालेल्या हायहोल्टेज ड्रामामुळे आमदार भोळे ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसून येत आहेत. सोमवारी आमदार भोळे यांनी दिवसभर भाजपच्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन, सद्य:स्थितीचा आढावा घेतला. माजी आमदार स्मिता वाघ, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालानी, जिल्हा महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, चंद्रकांत कापसे यांच्यासह काही नगरसेवकदेखील याठिकाणी ठाण मांडून होते. दिवसभर काही नगरसेवकांशी संपर्क करण्यात आला, तर भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील भाजपच्या बाजूच्या असलेल्या नगरसेवकांचे लोकेशन तपासून त्यांच्याशी संपर्क ठेवण्यात येत होता.
शिवसेनेची सूत्रे ‘लढ्ढा फार्म’वरून
भाजपची सर्व सूत्रे अजिंठा विश्रामगृहावरून सुरू असताना शिवसेनेची सर्व सूत्रे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या लढ्ढा फार्मवरून सुरू होती. याठिकाणी माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, माजी महापौर ललित कोल्हे, प्रशांत नाईक, नितीन बरडे, अमर जैन यांच्यासह शिवसेनेचे काही पदाधिकारीदेखील उपस्थित होते. भाजपकडून शिवसेनेत येणाऱ्या काही नगरसेवकांशी संपर्क केला जात होता. यासह भाजपच्या सहलीवर गेलेल्या नगरसेवकांशीदेखील विरोधी पक्षनेते सुनील महाजन संपर्कात राहून तासाभरात चर्चा करत होते.
शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी घेतले आठ अर्ज
भाजपचे काही नगरसेवक फुटल्याने मनपात शिवसेनेच्या देखील आशा पल्लवित झाल्या असून, सोमवारी शिवसेनेकडून महापौर व उपमहापौरपदासाठीचे प्रत्येकी चार असे एकूण आठ अर्ज घेण्यात आले आहेत. यावेळी नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अमर जैन आदी उपस्थित होते.