जळगाव : कोरोनाचे संकट असो की पूरस्थिती असो, या परिस्थितीत माणसांना जगविण्याऐवजी मेलेल्या माणसांचे आकडे जाहीर करणारे सरकार राज्यात आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार आशीष शेलार यांनी जळगावात केली. मुंबई विमानतळाला भाजप सरकारनेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले असून आता या सरकारने हस्तांतराचा ठराव करून नंतर टक्केवारी घेतली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला. जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करीत मनसे असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांच्याशी भाजप युती करणार नाही, असेही स्पष्ट केले.
कोरोना संकटापासून लपवा-लपवी
कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आकडे लपविण्यात आले. आता कोकणात पुराविषयी रेड ॲलर्ट देण्यात आला असताना तेथील नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही. नंतर पुराचे संकट आले व मृतांचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यामुळे हे सरकार वाचविणारे नाही तर मृतांचे आकडे सांगणारे सरकार असल्याचे शेलार म्हणाले. पूरग्रस्तांना केलेली मदत परत घेण्यात येते, एवढे हे हवालदिल सरकार असून तेथील पालकमंत्रीही उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. कोरोना संकटात शालेय शुल्क वाढीबद्दल त्यांनी शिक्षण सम्राटांसमोर झुकू नका, असा सल्ला राज्य सरकारला दिला.
मागच्या दरवाजाने भेटणे शिवसेना-राष्ट्रवादीचे धंदे
मुंबई विमानतळावर अदाणी यांचे नाव लागल्यानंतर शिवसेनेने तोडफोड केल्याविषयी शेलार यांना विचारले असता, ते म्हणाले की, या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव भाजप सरकारनेच दिले. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने विमानतळ अदाणी यांच्याकडे हस्तांतरीत करण्याचा ठराव केला. मात्र हा ठराव करताना त्यात कोणत्याही अटी शर्ती टाकल्या नाहीत. ठराव करायचे व मागच्या दरवाजाने भेटून टक्केवारी घ्यायची, हे शिवसेना व राष्ट्रवादीचे धंदे आहेत, अशा शब्दात शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली.
परिवहन नाही तर परिवाराचे मंत्री
परिवहन मंत्री अनिल परब हे परिवार मंत्री झाले आहे. ते एकाच परिवाराची सेवा करीत असल्याची टीका शेलार यांनी केली. कर्मचाऱ्यांनी पुरात देखील काम केले. हे दुःख राज्य सरकार पाहत देखील नाही. जुन्या बस चालविल्या जाताय, पगार वेळेवर होत नाही, असा महामंडळांचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे ते म्हणाले. विधानसभेत कोणत्याही प्रश्नावर आवाज उठवू नये, यासाठी निलंबन केले जाते, असेही ते म्हणाले.
गुलाबरावांचे इतरांच्या मुलांवर लक्ष
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंढे यांचा शिवसेनेत सन्मान होईल, असे वक्तव्य केले होते. त्या विषयी शेलार म्हणाले की, गुलाबराव पाटील माझे चांगले मित्र आहे, त्यांच्याविषयी बोलणार नाही. मात्र त्यांचे दुसऱ्यांच्या मुलांवर अधिक लक्ष असते स्वत: काही तरी करावे, असा टोलादेखील लगावला.