लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाला चर्चा करण्यासाठी सोमवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाकडे दोन तृतीयांश सदस्यांची मते मिळत नाही, म्हणून दाखल केलेला प्रस्ताव बारगळणार, या भीतीने भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या मध्यस्थीने सभेत प्रस्ताव मागे घेतला. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपा गटाला मोठा हादरा बसला आहे.
या सभेत शहर विकास आघाडी, शिवसेना व अपक्ष एकत्र आल्याने पालिकेत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले.
नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी व नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष पदावर अविश्वास प्रस्ताबाबत आयोजित विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाली. या सभेत प्रारंभी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतल्यानंतर ही सभा दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षा चव्हाण यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुपारी ३ वाजता नगराध्यक्षा चव्हाण यांची प्रकृती सुधारल्याने पालिकेत उपस्थित झाल्या. सभेत प्रारंभी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी कटूता बाजूला ठेवून शहर विकासासाठी एकत्र काम येऊ. भाजपाने दाखल केलेला प्रस्ताव आम्ही मागे घेत आहोत. त्यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या सूचनेला गटनेते संजय रतनसिंग पाटील यांनी अनुमोदन दिले.
ही सभा का घेण्यात आली व त्याबाबतचा कोणता निर्णय घेतला गेला, याची विचारणा नगरसेवक सूर्यकांत ठाकूर यांनी सभेत केली. यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांची बाचाबाची सुरू असताना पिठासन अधिकारी आशालता चव्हाण यांनी सभेची सांगता केली.
या सभेत उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण,मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.