जळगाव : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणीचा आरोप केला असून याचे पडसाद जळगावातही उमटले. या प्रकरणात गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत महानगर भाजपकडून मोर्चा काढून टॉवर चौकात गृहमंत्री देशमुख यांची प्रतिमा जाळली. यासह सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आले. खंडणीखोर सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यालयापासून घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यानंतर टॉवर चौकात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिमा जाळण्यात आली.
हे भ्रष्ट सरकार असून गृहमंत्रीच जर शंभर कोटींची खंडणी मागत असतील तर जनतेने पाहायचे कोणाकडे, ही शंभर कोटी खंडणी केवळ मुंबईत असून राज्यात तर हे आकडे हजारो कोटींच्या घरात असतील, असा आरोप आमदार भोळे यांनी आंदोलनानंतर केला. केवळ बदल्या आणि खंडणीवर चाललेले हे सरकार असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, माजी महापौर भारती सोनवणे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, मनोज भांडारकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला पदाधिकारी बचावल्या
आंदोलनादरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रतिमेला काही महिला पदाधिकाऱ्यांनी चपला मारल्या. या प्रतिमेवर काही कार्यकर्त्यांनी बाटलीतून पेट्रोल टाकले. ही प्रतिमा महिला पदाधिकाऱ्यांच्या हातात असतानाच अचानक ती पेटविण्यात आली. पेट्रोल असल्याने प्रतिमेने अगदी झपाट्याने पेट घेतला. यात महिला पदाधिकारी तातडीने बाजूल्या झाल्याने बचावल्या. यात नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे या खाली कोसळल्या.