लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेच्या सत्ताधारी भाजपचे गणित विमानतळावर झालेल्या बैठकीपर्यंत आवाक्यात होते. मात्र या बैठकीनंतर सभागृह नेते ललित कोल्हे हे थेट लढ्ढा फार्मवर जाऊन शिवसेनेला मिळाल्याने भाजपचे सर्व गणित बिघडण्यास सुरुवात झाल्याची माहिती भाजपचा अधिकृत सूत्रांनी दिली आहे. सतरा नगरसेवक सुरुवातीला फुटले होते, मात्र त्यानंतरही भाजप कडे ४० नगरसेवक असल्याने भाजपच्या नेतृत्वाला महापालिकेतील सत्ता कायम ठेवू असा विश्वास होता. मात्र कोल्हे भाजप सोडून गेल्यानंतर एकापाठोपाठ एक नगरसेवक देखील सेनेचा गळाला लागल्याने भाजपचेच समीकरण बिघडल्याची चर्चा आहे.
आमदार सुरेश भोळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन भाजपच्या ११ नगरसेवकांनी बंड केले. मात्र या बंडानंतर देखील भाजपचे नेतृत्व अतिआत्मविश्वासातच राहून सुरुवातीला या बंडाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. तसेच पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचा फार्महाऊसवर फुटले नगरसेवक जमा झाल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी भाजपचे एकूण १७ नगरसेवक उपस्थित होते. ही माहिती मिळाल्यानंतरच खळबळून जागी झालेल्या माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील बालानी रिसॉर्ट या ठिकाणी होणारी बैठक रद्द करून विमानतळावर तातडीची बैठक घेण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या. तसेच या ठिकाणी नगरसेवकांना संपूर्ण सामान घेऊन उपस्थित राहण्याबाबत देखील सूचना महाजनांनी दिल्या होत्या. तसेच विमानतळावर झालेल्या बैठकीत भाजपचे २७ नगरसेवक उपस्थित होते. व इतर महिला नगरसेविकांचे पती या ठिकाणी उपस्थित असल्याने, महापौर पदाचा निवडणुकीतही बहुमत कायम राहील या आशेवर माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी निश्चित होते.
कोल्हे गेल्यानंतर भाजपने गमावला बहुमताचा आकडा ?
२०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे तत्कालीन महापौर ललित कोल्हे यांना भाजपमध्ये आणले. त्यांच्यासह शिवसेनेत गेलेले अकरा नगरसेवक देखील भाजपमध्ये आले. कोल्हे यांना आपल्याकडे खेचून भाजपने शिवसेनेचे संपूर्ण खच्चीकरण या निवडणुकीत केलेले होते. आता ललित कोल्हे यांना पुन्हा भाजप मधून शिवसेनेत आणत शिवसेनेने भाजपचे खच्चीकरण करण्याचा डाव साधला आहे. ललित कोल्हे यांनी भाजपला जय श्रीराम केल्यानंतर त्यांच्यासोबत पार्वताबाई भिल, रेखा पाटील, प्रवीण कोल्हे व सिंधूताई कोल्हे हे चार नगरसेवक देखील भाजप मध्ये आल्यामुळे सत्ताधारी भाजपचे संपूर्ण समीकरणाची बदलल्याचे चित्र दिसून येत आहे.
आमदार भोळे यांच्या प्रभागातील नगरसेवक शिवसेनेच्या गोटात
शिवसेनेकडे आतापर्यंत भाजपचे २५ व एम आय एम चे ३ असे २८ नगरसेवक मिळाले होते. त्यात मंगळवारी शिवसेनेने प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक प्रा.सचिन पाटील यांना देखील आपल्या गोटात समाविष्ट करून घेतले आहे. सचिन पाटील आमदार सुरेश भोळे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच आमदार भोळे यांच्या प्रभागामधूनच सचिन पाटील विजयी झाले होते. प्रा.सचिन पाटील हे सोमवारी आमदार सुरेश भोळे यांच्यासोबत अजिंठा विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत उपस्थित होते. मात्र मंगळवारी दुपारी सचिन पाटील देखील ठाणे जाण्यासाठी रवाना झाल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.