लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेवर असलेले ‘हुडको’चे कर्ज फेडल्याबाबत आमदार सुरेश भोळे नेहमीच श्रेय घेत असतात. मात्र, हुडकोच्या कर्जातून महापालिका अजूनही मुक्त झालेली नसताना नागरिकांची दिशाभूल करून आमदार केवळ श्रेय घेत असल्याचा आरोप करत शिवसेना सदस्यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपला चांगलेच कोंडीत पकडले. महापालिकेची सत्ता गमावल्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही बहुमत गमावल्यामुळे भाजपचे सदस्य या सभेत बॅकफुटवर गेलेले पाहायला मिळाले. या सभेत भाजपकडून सभापती राजेंद्र घुगे-पाटील, उज्ज्वला बेंडाळे व अमित काळे यांनी काही प्रमाणात शिवसेना सदस्यांचा आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनेच्या आरोपांवर भाजप पहिल्यांदाच कोंडीत सापडल्याचे दिसून आले.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन बुधवारी दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सभापती राजेंद्र घुगे-पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त संतोष वाहुळे, प्रशांत पाटील, श्याम गोसावी आदी उपस्थित होते. या सभेत सभापतींनी मनपा प्रशासनाने सादर केलेला अंदाजपत्रकात काही बदल सुचवून काही वाढीव तरतुदींची माहिती सभागृहाला दिली.
फुगीर आकडे न दाखवता, करता येईल एवढीच तरतूद करा - उपमहापौर
सभापतींकडून अर्थसंकल्पात काही बदल सुचविण्यात आल्यानंतर त्यावर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आक्षेप घेतले. तसेच अर्थसंकल्पात केवळ जनतेची दिशाभूल होईल, यासाठी मोठे आकडे सादर न करता जेवढी कामे होऊ शकतील तेवढीच तरतूद करा, असे सभापतींना सांगितले. तसेच आतापर्यंत भाजपने केवळ विकासाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल केली असून, आता महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे आता तरी विकासाच्या खोट्या गप्पा मारू नका, असेही कुलभूषण पाटील यांनी सांगितले. त्यावर उज्ज्वला बेंडाळे यांनी आक्षेप घेत, आता तुम्हाला संधी दिली आहे तुम्ही आधी चांगले काम करून दाखवा त्यानंतरच आरोप करा, असे उपमहापौरांना सुनावले.
केवळ मालमत्ता कराच्या रकमेवर विकास अशक्य
शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी अर्थसंकल्पात दरवर्षी कोट्यवधींची तरतूद केली जाते. मोठमोठी आश्वासने देत आकड्यांचा जुगाड केला जातो. मात्र, असे असतानाही शहराचा विकास का होत नाही? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. तसेच शहरात मनपाच्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या जागा अनेक वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. या जागा ताब्यात घेणे किंवा त्याचा वापरदेखील महापालिका प्रशासनाला करता आलेला नाही. या जागा वापरात आणल्या किंवा विक्री केल्या तरीही महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. मालमत्ता कराच्या रकमेवर शहराचा विकास करणे अशक्य असल्याचे सांगत, हीच परिस्थिती कायम राहिली तर शहराचा विकास होणे शक्य नसल्याचे लढ्ढा यांनी सांगितले.
अडीच वर्षात शहराची दुर्दशा केल्याने भाजपवर ही वेळ आली - नितीन लढ्ढा
अडीच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने केवळ नागरिकांना आश्वासनाचे गाजर दिले. हुडकोपासून महापालिका कर्जमुक्त केल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, अजूनही हुडकोच्या कर्जापोटी राज्य शासनाला ७१ कोटी रुपयांची देणी बाकी असताना महापालिका कर्जमुक्त कशी? असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपने आता तरी सोडावे, असे सांगत शिवसेना सदस्यांनी भाजपला या सभेत चांगलेच कोंडीत पकडले. लढ्ढा यांचा प्रश्नावर सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी महापालिका कर्जमुक्त असल्याचेच सांगितले. तसेच व्याज नसताना कोणतीही रक्कम कर्जस्वरुपात नसल्याचेही सभापतींनी सांगितले.