भुसावळ तालुक्यात १९९५ पर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना, २००१ पासून राष्ट्रवादी तर २०१४ पासून भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र अद्यापही भाजपाला आव्हान देण्याची ताकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, भाजपाचे वर्चस्व दिसून येत असले तरी शहरात माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी व वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे व स्थानिक पदाधिकारी यांच्यामधील गटबाजीही दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यात शिवसेना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती भूमिका घेते यावरही राजकीय समीकरण अवलंबून आहे.तालुक्यात १९९५ पर्यंत काँग्रेसचे (पर्यायाने भाजपाचे विद्यमान नगराध्यक्ष रमण भोळे यांचे वडील माजी आमदार स्व.देवीदास भोळे यांचे) वर्चस्व होते. १९९५ साली शिवसेनेने हा मतदारसंघ काबीज केला. तेव्हापासून काँग्रेस तालुक्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. आताची परिस्थिती पाहता काँग्रेसचा तालुक्यात एकही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच नाही. किंवा कोणत्याही संस्था काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या शाखाही कुठेच दिसून येत नाही, अशी बिकट अवस्था कॉंग्रेसची झाली आहे.माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली. शिवसेनेला २००४ पासून विधानसभेतून बाहेर काढले. २००९ नंतर शिवसेनेची अवस्था अतिशय हलाखीची केली. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय ब्राह्मणे हे अनामत रक्कमही वाचू शकले नाही. त्यानंतरही झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदार अॅड.श्याम गोंदेकर यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक मुकेश गुंजाळ वगळता बहुतांश उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. शिवसेनेची त्यानंतरही ताकद फारशी वाढल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भाजपाला केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच आव्हान देवू शकते, असे चित्र आहे. भाजपाची तालुक्यात शिवसेनेचा सहकारी मित्र पक्ष म्हणून ओळख होती. २०१४ साली तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रूपाने भाजपाला आमदार मिळाला. तर त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष भाजपाचाच निवडून आला.दोन ठिकाणी भाजपाने सत्ता काबीज केली असली तरी माजी आमदार चौधरी यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकी संघावर वर्चस्व मिळवून सहकार क्षेत्रावर त्यांचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. तालुक्यात भुसावळ व वरणगाव अशा दोन नगरपालिका आहे. दोन्ही नगरपालिकांवर भाजपाची सत्ता आहे. मात्र भुसावळ न.पा.वर माजी मंत्री खडसे तर वरणगाव न.पा.वर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. वरणगाव नगरपालिकेत तर भाजपात सरळसरळ दोन गट आहे. भुसावळ न.पा.मध्ये भाजपाचे २८ नगरसेवक आहेत. माजी आमदार चौधरी यांच्या ‘जनाधार’चे १९ नगरसेवक आहेत.
भुसावळ तालुक्यात भाजपाचे वर्चस्व मात्र गटबाजीला आवर आवश्यक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:01 PM