भाजपा नेत्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा यांनी आपल्या भाषणातून थेट भाजपवरच अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी, विविध समाज घटकांच्या आरक्षणाचा मुद्दा आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरुन पंकजा यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच, मी दोन महिने घरात बसले तर माझ्याविषयी अनेक वावड्या उठविण्यात आल्या. आता प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा असे कोणी म्हणणार असेल तर ते चालणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी स्वपक्षाला दिला. आता, पंकजा यांच्या भाषणाबद्दल भाजप नेते गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दसरा मेळावा झाला. यावेळी त्यांनी सरकारला घरचा आहेर देत मनातील खदखद व्यक्त केली. मी आता घरात बसणार नाही. मैदानात उतरले आहे. पडणार नाही तर पाडणार, असा इशाराही त्यांनी दिला. मी गोपीनाथ गड तीन महिन्यांत बनवला; परंतु, सरकारतर्फे अजूनही स्मारक बनवले नाही, अशी खंतही व्यक्त केली. तसेच, आता ते स्मारक बनवू नका, असेही त्यांनी म्हटले. पंकजा यांनी थेट जाहीर भाषणातून भाजपा पक्षालाच इशारा दिलाय. त्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, महाजन यांनी उत्तर दिलं.
पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केल ते पक्षाच्या संदर्भात नसेल. मी नेमकं त्यांच भाषणं ऐकलं नाही. ऐकल्यानंतर काय ते बोलता येईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. त्यामुळे, एकंदरीत पंकजा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्याचं गिरीश महाजन यांनी टाळलं आहे. दरम्यान, पंकजा यांच्या भाषणावर एकाही नेत्याने भाजपच्या एकाही बड्या नेत्यानं प्रतिक्रिया दिली नाही.
संजय राऊतांवरही निशाणा
गिरीश महाजन यांनी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचं एकमत झालं आहे. सरसंघचालकांनी आमच्यासोबत यावं, असं राऊत यांनी म्हणणं म्हणजे वेड्या माणसाने बरळण्यासारखं आहे. वाटेल तसं, वाटेल ते बोलायचे. त्यामुळे या माणसाच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे, असं सर्वपक्षीय लोकांचे एकमत झाले आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली.