प्रशांत भदाणेएकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये असलेल्या आमदारांना संबोधित करत असतानाचा एक व्हिडिओ काल समोर आला होता. यात त्यांनी एक महाशक्ती आपल्या पाठिशी आहे असं विधान केलं होतं. ही महाशक्ती नेमकी कोणती? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. दरम्यान, भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.
सगळ्यांना सूरत, गुवाहाटी आणि नंतर मुंबई आपली सत्ता आता येणार आहे. आपल्याला महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या दृष्टीनं पुढे न्यायचं आहे. आषाढीला पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हातूनच पूजा होईल, असं वक्तव्य उन्मेष पाटील यांनी केलं. खासदार उन्मेष पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने जळगावात त्यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात मनोगत व्यक्त करतांना त्यांनी हे वक्तव्य केलं. खासदार उन्मेष पाटलांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाच्या मागे भाजपचा हात असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांसोबत सुरतमध्ये भाजपचे नेते मोहित कंबोज पण दिसून आले होते, त्यानंतर आता खासदार उन्मेष पाटलांनी जाहीर कार्यक्रमात आपलं सरकार येतंय, अशा प्रकारचे वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप साथ देत असल्याचे संकेत मिळत आहेत.
लोकशाहीत संख्याबळाला महत्त्व - एकनाथ शिंदे"आज सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्यात काही निर्णय घेतले जातील. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदारांचं निलंबन करण्याचा अधिकारच अल्पमतात असलेल्या गटाला नाही. अल्पमतात असलेल्यानं असा निर्णय घेता येत नाही. बैठकीला अनुपस्थित राहिलो नाही म्हणून आमदारी रद्द केली तर देशातील हे पहिलं उदाहरण ठरेल. कायद्यानुसार सर्व गोष्टी चालत असतात. लोकशाहीत आकडे आणि संख्याबळाला महत्व असतं", असं एकनाथ शिंदे म्हणाले.