जळगाव- जिल्ह्यातील धरणगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जनजाती मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी भाजपा सरकारला संवेदनशील सरकार असे म्हणत सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. यामुळे संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून भाजपाला एक प्रकारे बळच देण्यात आले. यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या मदतीला संघ मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.भैय्याजी जोशी हे संघात क्रमांक दोनचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे केलेल्या या कौतुकात गुपितही दडले आहे. सोबत अ.भा.धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, रा.स्व.संघाचे क्षेत्रप्रमुख बाळासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.क्रांतीकारक खाज्याजी नाईक स्मृतिसंस्थेतर्फे आयोजित या मेळाव्यास भैय्याजी जोशी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी जोशी यांनी या सरकारने सर्वच योजनांचा लाभ हा तळागाळापर्यंत पोहचवला असल्याने हे आदर्श सरकार असल्याचे सांगत पाठराखण केली.जोशी यांनी क्रांतीकारक खाज्याजी नाईक यांच्या स्वातंत्र लढ्यातील कामगिरीचा तसेच बलिदानाचा उल्लेख केला. एवढेच नाही तर आदिवासी क्रांतीकारकांची तसेच आदिवासींची कामगिरीही स्वातंत्र्य लढ्यात उल्लेखनीय असल्याचे सांगत आपण सर्व मूळ आदिवासीच असल्याचा दाखला दिला. त्यामुळे आदिवासी समाजालाही जवळ करण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून संघाने केला आहे.खाज्याजी नाईक स्मारकाच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १५ कोटीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी धरणगाव येथील जनजाती मेळाव्यात केली.
भाजपाच्या मदतीसाठी संघ मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:39 AM
सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले सरकारचे कौतुक
ठळक मुद्देजनजाती मेळाव्याचे आयोजन