लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील सत्ताधारी भाजपचे एकूण ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, हे बहुमतच आता भाजपची डोकेदुखी ठरत आहे. अनेकदा सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, आता बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मनपा संविदाचा विषय रोखण्यासाठी भाजपच्याच नगरसेवकांकडून प्रयत्न करण्यात आले. तर दुसरीकडे याच सफाईच्या ठेक्यात भाजपच्याच एका बड्या पदाधिकाऱ्याचा समावेश होता. हे ठाऊक असूनही बुधवारी सफाईच्या ठेक्यावरूनच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून संविदाच्या विषयावरून घेरण्याचा प्रयत्न केला.
वॉटरग्रेसचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये बंद केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात मनपाच्या बांधकाम विभागात मजुर पुरविण्याचे काम करत असलेल्या एस.के.कॉन्ट्रॅक्टरला तात्पुरत्या स्वरुपात शहरातील सफाईचे काम देण्यात आले. याबाबत स्थायी च्या समितीत आयुक्तांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तर देत, त्यांची शंका काढण्याचे काम केले. तसेच भाजप नगरसेवकांची ही शंका आधीच दुर झाली होती की आयुक्तांनी दुर केल्यानंतर झाली हा शोधाचा विषय असला तरी या ठेक्यात भाजपच्या एका बड्या नगरसेवकाचा काही टक्के सहभाग असल्यानेच भाजप नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली असल्याची माहिती भाजपच्याच सुत्रांनी दिली आहे.
भाजपतच दोन गट
संविदाच्या विषयांना एकीकडे स्थायीतील तीन नगरसेवकांनी विरोध केला असताना इतर नगरसेवकांनी या विषयावर बोलणे टाळले. तसेच स्थायी समिती सभापतींची भूमिका देखील विरोध करणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेविरोधातच होती. मात्र, स्थायी आधी झालेल्या पक्षाच्या बैठकीत या संविदांना विरोध करण्याची भूमिका निश्चित झाल्याने इतर नगरसेवकांनी या विषयाला विरोध किंवा समर्थन देखील केले नाही. तर इतर तीन नगरसेवकांनी या विषयावर प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. स्थायीत या विषयावर चर्चा सुरु असता
शिवसेनेच्या नगरसेवकांना भाजपकडून रसद
भाजपतील गटबाजी मोठ्या प्रमाणात वाढत जात असून, आता सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे मुद्दे खोडण्यासाठी सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांकडून विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना नगरसेवकांना रसद पुरविली जात असल्याचे चित्र बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत दिसून आले. यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी आता मोठे स्वरुप घेताना दिसून येत आहे.