लोकमत न्यूज नेटवर्क
वरणगाव : पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी भाजपतर्फे बुधवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
शहरासाठी २४ तास पाणी मिळेल, अशा प्रकारची २५ कोटीची पाणीपुरवठा योजना भाजप सरकारच्या काळात मंजूर करून झाली होती. ५ डिसेंम्बर रोजी राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली. तसेच ५ जूनच्या सभेत वरणगाव शहर विकास विरोधी आघाडीने जास्त दराने निविदा आली म्हणून व कर्मचारी यांच्या पगाराचा बहाणा करून पाणी योजनेची निविदेचे टेंडर पुन्हा काढण्याचा ठराव केला. परंतु, मंजूर पाणी योजनेचे काम त्वरीत सुरू करा, या मागणीसाठी भाजपातर्फे रस्ता रोको आंदोलन उपोषण झाले. मात्र, सरकारला जाग येत नाही म्हणून दि. २३ डिसेंबर रोजी शेकडो महिला व नागरिकांच्या उपस्थितीत व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचे नेतृत्वाखाली वरणगाव येथील भोगावती नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन पार पडले.आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी शहराध्यक्ष सुनील माळी, अल्लाउद्दीन सेठ, अशोक श्रीखंडे, दत्तू मराठे, संजयकुमार जैन, गोलू राणे उपस्थित होते.