धरणगाव : पाणी प्रश्नावरून भाजपतर्फे सोमवारी पालिकेवर जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून धरणगावकर पाण्याच्या समस्येला अतिशय संयमाने तोंड देत आहेत. अजून किती दिवस आपण हा अन्याय सहन करीत राहणार? ही समस्या जर आपल्याला कायमस्वरूपी मिटवायची असेल तर आपण सर्वांना एकत्र येऊन आपला आक्रोश व्यक्त करावा लागेल, असे आवाहन भाजपने केले आहे.जनआक्रोश हंडा मोर्चा २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता बालाजी मंदिरापासून ते नगर पालिकेपर्यंत काढण्यात येणार आहे. भाजपने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक वेळी असलेल्या सत्ताधार्यांनी आपल्या याच समस्येकडे हेतुपुरस्कर प्रत्येक निवडणुकीच्या आधी खोटी आश्वासने देऊन, जनतेच्या भावनांशी खेळून विविध प्रलोभने देऊन अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. ज्याचा अनुभव आपण वारंवार घेत असतो. मागील दोन महिन्यांपासून तर जनतेचा संयमाचा व सहनशीलतेचा अंत होईल, अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. दिवाळीसारख्या सणावेळी १५ ते ३० दिवसाआड पाणीपुरवठा केला गेला. मागील पाण्याचे आवर्तन तर २० ते २५ दिवसाआड मिळाले. तरी आपण सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपने शहरवासीयांना केले आहे.
धरणगाव पालिकेवर सोमवारी भाजपचा जनआक्रोश हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 1:58 PM