लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजप जिल्हा ग्रामीणची बहुप्रतिक्षीत कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी जाहीर केली आहे. कार्यकारणीत एकूण २९ जणांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक तालुका व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्यासह १२ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री तर ६० सदस्य कायम निमंत्रित आहेत. माजी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या नियुक्तीनंतर ही कार्यकारणी जाहीर केली जाणार होती. मात्र, हरिभाऊ जावळे यांच्या अकाली निधनामुळे व त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भावामुळे ही कार्यकारणी रखडली होती. त्यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे ही कार्यकारणी जाहीर करण्यास अडचणी आल्या होत्या. मात्र, आता भाजपने जम्बो कार्यकारणी जाहीर केली आहे.
आगामी सहकार व जि.प. निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
जिल्ह्यातील १ हजारहून अधिक सहकारी संस्थाच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यातच नगरपालिका व वर्षभरात होणाऱ्या जि.प. व पंचायत समित्यांचा निवडणुकांच्या तयारीसाठी ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवून काही युवकांना देखील स्थान दिले आहे. आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीसाठी कार्यकारणीतील सदस्यांना लवकरच पक्ष संघटनेच्या कामात सहभागी होण्याचा सूचनाही जिल्हाध्यक्षांनी दिल्या आहेत.
यांचा आहे समावेश
उपाध्यक्ष म्हणून पी.सी.पाटील, पद्माकर महाजन, राकेश पाटील, डी.एस.चव्हाण, अजय भोळे, के.बी.सांळूखे, कांचन फालक, महेश पाटील, नंदकिशोर महाजन, रेखा चौधरी, भरत महाजन, विजय धांडे, सचिन पान-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीस म्हणून मधुकर काटे, हर्षल पाटील, नवलसिंग राजपूत, कविता महाजन यांची तर चिटणीसपदी सविता भालेराव, ॲड.प्रशांत पालवे, राजेंद्र चौधरी, संतोष खोरखेडे, रंजना नेवे, रविंद्र पाटील, मेघा जोशी, सोमनाथ पाटील, शैलजा चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी अनिल खंडेलवाल व कार्यालय मंत्री म्हणून गणेश माळी यांची निवड करण्यात आली आहे.