जळगाव : वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्याची वीज कापल्याने त्यांचे मोठे नुकसान होणार असून, हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. असे सांगत शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडल्यास भाजप किसान मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिला आहे. याबाबत १५ रोजी तहसीलदारांना माजी आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
आत्महत्येची चौकशी करा
जळगाव : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केली आहे. पूजाने आत्महत्या का केली किंवा राजकीय फायद्यासाठी तिचा घातपात झाला. या सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
रुग्णवाहिकेने तोडले गेट
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मुख्य गेट गुरुवारी सायंकाळी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तोडले. यानंतर या गेटला वेल्डींग करून जोडण्यात आले. हे गेट अर्धवट उघडले जात असल्याने रुग्णवाहिकांना रुग्णालयात येण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
महाविद्यालय गजबजले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी संख्या वाढल्याने गेल्या आठवडाभरापासून परिसरात गर्दी वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून ओस पडलेले महाविद्यालय पुन्हा एकदा गजबजले आहे. कॅन्टीनमध्ये जागा कमी असल्याने आम्हाला बसण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी घेऊन काही विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेतली.