जळगाव: लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात आयोजित बैठकीत कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव मगन पाटील (रा.चोपडा) यांच्या तोंडावर काळी शाई फेकून महिला कॉँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्यासह दहा ते बारा जणांनी स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता कॉँग्रेस भवनात घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या पाश्वभूमीवर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड संदीप पाटील, आमदार सुधीर तांबे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, जिल्हा कॉग्रेस कमिटीचे व तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष असे काँग्रेस भवनात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता जमले होते. त्यावेळी अजबराव पाटील हे आपल्या दालनात बसले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अरुणा पाटील व त्यांचे सोबत १० ते १२ जण अचानक अजबराव पाटील यांच्या दालनात घुसले व त्यांनी पाटील यांच्या अंगावर तसेच तोंडावर काळी शाई फेकली. तसेच सोबतच्या लोकांनी चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन जणांनी स्टिलच्या रॉडने तसेच लाकडी दांड्याने खांद्यावर तसेच डाव्या हाताला मारहाण करत अजबराव पाटील यांना ओढत दालनाच्या बाहेर आणले. हा प्रकार पाहिल्यानंतर दालनातील नदीन काझी, सुभाष पाटील, मनोज चौधरी, राजेंद्र पाटील यांनी पाटील यांना सोडविले. याप्रकरणी अजबराव पाटील यांच्या यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात अरुणा पाटील यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात कलम १४३,१४७,१४९,३२३,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पदावरुन काढल्याच्या रागातून केले कृत्यअजबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अरुणा पाटील या सतत पक्षाविरुध्द कारवाया करीत असल्याने ३ ते ४ दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांनी त्यांना शहराध्यक्ष पदावरुन काढले.त्या रागातून अरुणा पाटील हे काही जणांना घेऊन आले व शाई फेकण्यासह मारहाण केल्याचे अजबराव पाटील यांनी म्हटले आहे.