सायबर गुन्हेगारी : उच्चशिक्षितच होताहेत शिकार
जळगाव : तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम व व्हाॅट्सॲप यासारख्या सोशल मीडियावर सक्रिय असाल तर सावधान.... सोशल मीडियावर मैत्री वाढवून अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवून ती समाजात व्हायरल करण्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जळगाव शहर व जिल्ह्यात डॉक्टर, वकील, प्राध्यापक व शिक्षक, आदींसह उच्चशिक्षित वर्ग याला मोठ्या प्रमाणात बळी पडल्याचे उघड झालेले आहे. सायबर पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारीवरून हे उघड झाले आहे.
गेल्या वर्षभरात येथील सायबर पोलीस ठाण्यात ३५ ते ४० जणांनी संपर्क करून त्यांच्याबाबत घडलेला प्रकार सांगितला आहे. काही जणांनी तक्रार दिली आहे. त्यावरून गुन्हे दाखल झाले आहेत. फेसबुकसह मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप, पॉर्न साईट, आदी ठिकाणी सायबर गुन्हेगार बनावट खाती बनवून पीडित व्यक्तींच्या संपर्कात येतात.
खातेधारक व्यक्ती ही हायप्रोफाईल व सुंदर तरुणी असल्याचे भासविले जाते. प्रथम पीडित व्यक्तीसोबत चॅटिंग करून मैत्री केली जाते. नंतर प्रेमाच्या गप्पा करून अश्लील बोलण्यात गुंतविले जाते. बहुतांशवेळा समोरील व्यक्ती पीडित व्यक्तीला फेसबुक व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून एकांतात जाण्यास सांगते. यावेळी त्याला नग्न होण्यास सांगून अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले जाते. याचवेळी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रित केला जातो. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याचा व्हिडिओ व छायाचित्र साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. २० हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत रक्कम मागितली जाते. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना ऑनलाईन पैसे पाठवितात, तर काहीजण सायबर पोलिसांकडे तक्रारी करतात.
अश्लील कृत्य करण्यास पाडले जाते भाग
एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाईन संपर्कात येऊन त्याचा मोबाईल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमध्ये घुसघाेरी करणे, त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे, व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे.
उच्चभ्रू लोकांना केले जातेय लक्ष्य..
सायबर गुन्हेगार पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्याआधी फेसबुकवर आधी त्याची प्रोफाईल पाहतात. व्यक्ती डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील अथवा उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल तर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले असून, काहींनी भीतीपोटी पैसेही दिले आहेत. त्यात डॉक्टर, वकील, प्राध्यापक असेही बळी पडले आहेत.
काय काळजी घ्यावी...
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
व्हिडिओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसेच कृत्य करू नये.
आपल्या फोनमध्ये खासगी, अर्धनग्न, नग्न फोटो, व्हिडिओ सेव्ह करून ठेवू नयेत.
कोट....
अशी काही घटना घडली तर कुणालाही पैसे देऊ नयेत. यासंदर्भात तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसविण्याचे प्रकार वाढलेले आहेत. बऱ्याचदा दिल्ली सायबर क्राईममधून बोलत असल्याचे देखील धमकावले जाते, मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
-बळिराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन