कळमसरे, ता.अमळनेर/चोपडा : मकरसंक्रांतीच्या रात्री कळमसरे, ता. अमळनेर येथे सहा, तर चोपडा येथे दोन ठिकाणी घरफोडय़ा झाल्या. दोन्ही ठिकाणी सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला.कळमसरे येथील बसस्थानक चौकात असलेली सहा दुकाने चोरटय़ांनी फोडली. यात चोरटय़ांनी बिअरच्या बाटल्यांसह सुमारे 70 ते 75 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. बाबूलाल यशवंत पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यात त्यांच्या मालकीच्या त्रिमूर्ती बिअरबार दुकानाचे चोरटय़ांनी कुलूप तोडून रोख रक्कम व दुकानातील बिअरच्या बाटल्यांसह 49 हजार 150 रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या दुकानासमोरील म्हाळसा ट्रेडर्समधून तीन हजार रुपये रोख, मुक्ताई पान दुकानातून चार हजार रुपयांची चिल्लर, गुरुदत्त पानटपरीतून सिगारेट्सचे डबे, पंकज हरकचंद छाजेड यांच्या किराणा दुकानातून तीन हजार रुपये रोख, तर वैशाली ङोरॉक्समधून 200 ते 300 रुपये चोरून नेले. शहापूर रस्त्यालगत वासरे फाटय़ाजवळ रिकाम्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार कंखरे करीत आहेत. चोपडा- शहरातील गंगाईनगर भागातील बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी दीड लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास केली. प्लॉट क्रमांक 35 मधील घरमालक व भाडेकरू दोन्ही बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत चोरटय़ांनी 14 रोजी रात्री 10 ते 15 रोजी सकाळी 8.30 वाजेदरम्यान घरफोडी केली. यात महेंद्र भगवानसिंग गिरासे यांच्या घरातील लाकडी कपाटात ठेवलेले 1 लाख चार हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व 16 हजार रोख असा एकूण 1 लाख 20 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला. तर त्यांचे भाडेकरू मच्छिंद्र पाटील यांच्या घरातील 23 हजार रुपयांचे दागिने व अडीच हजार रुपये रोख असा एकूण 25 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. (वार्ताहर)
एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडय़ा
By admin | Published: January 16, 2017 12:40 AM