जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता आंतरजिल्हा सीमांवर नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध घालून देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आंतरजिल्ह्यात विनाकारण प्रवास करण्यासदेखील बंदी घातली आहे. त्यामुळे आता सर्व पोलीस ठाणेस्तरावर नाकाबंदीचे नियोजन केले गेले आहे. सोबतच खाजगी वाहनांना अत्यावश्यक कारण वगळता आंतरजिल्ह्यात बंदी असेल. शासकीय व खाजगी बसेसमध्ये पन्नास टक्के क्षमेतेने मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सीमांवरदेखील नाकाबंदी करून कडक तपासणी केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
सर्व स्तरांतून तपास सुरू
कुसुंबा येथील ओम साईनगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांच्या पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याचा दोरी किंवा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. या प्रकरणा सर्व स्तरांतून तपास केला जात आहे. घरात चोरी झाल्याचेही दिसून येत आहे. त्यातच ओळखीच्या व्यक्तींचीसुद्धा चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.