जिल्ह्यात सद्यस्थितीत ५ हजार ७२५ रुग्ण उपचार घेत आहेत. रोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. त्याशिवाय मृत्यूचीही संख्या आता वाढू लागली आहे. जळगाव शहरात बुधवारी २२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा हा एकट्या शहराचा ३२० पर्यंत गेलेला आहे. ही चिंताजनक परिस्थिती आहे. संभाव्य धोके लक्षात घेता ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आलेला आहे. प्रशासनाने लादलेला नाही तर जनतेच्या काळजीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.
आस्थापना बंदच राहतील
प्रत्येक चौकात नाकाबंदी करुन विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना अटकाव केला जाणार आहे. अत्यावश्यक सेवा किंवा ज्यांना सूट देण्यात आलेली आहे, त्यांनी आपले ओळखपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे. शहरातील सर्व आस्थापना बंद राहतील, याची खबरदारी पोलीस घेतील. शहरातील सहा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याशिवाय वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी सलग तीन दिवस रस्त्यावर राहतील. रात्रीची संचारबंदी लागूच आहे. शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागात हे नियम लागू नाहीत.
कोट...
‘जनता कर्फ्यू’ हा जनतेच्या भल्यासाठीच आहे. या काळात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. संपूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त राहणार असून पेट्रोलिंग व नाकाबंदीद्वारे विनाकारण फिरणाऱ्यांना रोखले जाणार आहे. आस्थापना कडेकोट बंद राहतील, याची आम्ही काळजी घेऊ. नागरिकांनी कारवाईची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक