लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात असून, परजिल्ह्यात जाणाऱ्या सीमांचीही नाकाबंदी करण्यात आली आहे. शुक्रवार रात्रीपासूनच कन्नड, पिलखोड व अमोदे सीमांवरील बंदोबस्त चोख करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारणांसाठीच वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. शनिवारी या तिघाही सीमांवर तंबूसह बॕरिकेडस् लावण्यात आले आहेत.
चाळीसगावच्या सीमा अनुक्रमे औरंगाबाद, नाशिक व धुळे जिल्ह्यांना स्पर्श करतात. या सर्व सीमा शहरापासून २० ते २५ कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे येथील सीमांवरील नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. बंदोबस्त शुक्रवारी मध्यरात्रीपासून अलर्ट करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याची सीमा तरवाडे गावालगत आहे. येथे पूर्णपणे धुळे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त असतो.
कन्नड, अमोदे व पिलखोड चेकपोस्टवर बंदोबस्त
चाळीसगावहून औरंगाबाद हद्दीत कन्नड सीमेवरून प्रवेश होतो. सद्य:स्थितीत अत्यावश्यक सुविधांसह मालवाहू वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवासी वाहनांसाठी ई-पास आवश्यक असून, अत्यावश्यक कारणांसाठीचे अधिकृत कागदपत्रे असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. येथे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवस-रात्र आठ पोलीस व होमगार्ड येथे पहारा देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात जाणाऱ्या पिलखोड व अमोदे या दोन्ही सीमेवरही मेहुणबारे पोलीस स्थानकाकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधांसोबतच मालवाहू वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. येथेही शनिवारी बॅरिकेडस्सह, तंबू व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली.