जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, २ जुलै रोजी ‘लोकमत’ व इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्साहात सुरुवात झाली. या शिबिरास प्रतिसाद मिळत आहे.इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीमध्ये आयोजित केले आहे. शुभारंभप्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, माजी महापैर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष अनिल कांकरिया, ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्ज्वालन करुन शिबिराचे उद्घाटन झाले.प्रास्ताविकात मिलिंद कुलकर्णी म्हणाले, बाबुजींच्या संकल्पनेनुसार ‘लोकमत’ची वाटचाल सुरू असून महाराष्ट्र, गोव्यासोबतच देशाची राजधानी दिल्लीतही पोहचला आहे. सोबतच आॅनलाईन आवृत्तीच्या माध्यमातून ‘लोकमत’ जगभरात पोहचला आहे. बाबुजींच्या जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर घेण्यात येत असते. रेडक्रॉसचे कार्य संपूर्ण जगभरात लोकाभिमुख आहे़यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.