जळगाव : जिल्हा पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी ९ वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात तब्बल १२१ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांनी रक्तदान केले.
कोरोना प्रादुर्भाव कायम आहे. ऑक्सिजनचा तुटवडा अनेक ठिकाणी भासत आहे तर रक्ताचा तुटवडा देखील भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटीतर्फे शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे, प्रताप शिकारे, बापू रोहोम, रवीकांत सोनवणे, विलास शेंडे, अनिल बडगुजर, विठ्ठल ससे, अरूण धनवडे, संतोष सोनवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी शिबिरात जिल्हा पोलीस दलातील तब्बल १२१ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.