जळगाव : मला माझ्या आईची बाहेर तपासणी करायची असल्याने तपासणीसाठी तिचे रक्त घेण्यासाठी मी आलो आहे़ मी स्वत: डॉक्टर आहे, असे सांगत एकातरुणाने गणपती रुग्णालयात सुरक्षा यंत्रणा भेदून, बाधित कक्षात थेट प्रवेश केला व आईच्या रक्ताचे नमुने घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़मिळालेल्या माहितीनुसार शिवकॉलनी येथील एक ६९ वर्षीय महिला कोरोना बाधित असून ही महिला २६ जूनपासून गणपती रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल आहे़ मंगळवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास या महिलेचा मुलगा या ठिकाणी आला व कर्तव्यावर असलेल्या डॉ़ स्वप्नील कळसकर यांना मला डॉक्टरांनी आईचे रक्ततपासणी करायला सांगितले असून ते मी घ्यायला आलो आहे, असे सांगितले़ त्यासाठी तुम्ही मला रक्तनमुने द्या, असेही तो म्हणाला़ मात्र, हे शासकीय रुग्णालय असून अशा प्रकारे या ठिकाणाहून रक्त देता येत नाही, असे डॉ़ कळसकर यांनी त्याला सांगितले़ यानंतर दोघांमध्ये वादविवाद झाल्यानंतर डॉ़ कळसकर यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुशांत सुपे यांना याबाबत कळविले़ आपल्या प्रयोगशाळेतच सर्व चाचण्या होत असल्याने बाहेर खाजगी प्रयोगशाळेमध्ये तपासणीकरीता नमुने घेण्याची परवागनी नाही, असे समजावून त्यास सांगा, असे डॉ़ सुपे यांनी डॉ़ कळसकर यांना सांगितले़ मात्र, तरीही महिलेच्या मुलाने रक्ताचे नमुने घेऊन निघून गेल्याने न्याय वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ़ वैभव सोनार यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला आहे़विना पीपीई किट केला प्रवेशमहिलेच्या मुलाने डॉक्टरांना व सुरक्षा यंत्रणांना न जुमनता विना पीपीई किट, विना परवानगी थेट अतिदक्षता विभागात प्रवेश केला व महिलेच्या बेडजवळ जावून इंजेक्शनने थेट रक्त काढले व नमुना घेऊन तो बाहेर निघून गेला़ पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनीही अडवणूक केली मात्र, रुग्ण माझी आई असून नमुने घेणे आवश्यकच असल्याचे तो सांगत होता़ डॉ़ आदित्य बेंद्रे, परिचारिका शिल्पा पाटील, सुरक्षा रक्षक लक्ष्मण वाघ, सफाईकामगार रोहित कुमावत आदी सर्व हजर असतानाही त्याने याबाबत कुणाचेही काही एक न ऐकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़उपचार होत नसल्याचे कारणशासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने मीच बाहेर उपचार करतो, मी डॉक्टर आहे, असे हा मुलगा सांगत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे़ मात्र, डॉक्टर्स केवळ त्याच्या सांगण्यावर कसा विश्वास ठेवणार व शिवाय अशाप्रकारची तपासणी रुग्णालयात दाखल असताना बाहेर करणे हे बेकायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़ या घटनेवरून मात्र, रुग्णांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे़बेड नसल्याने चार संशयित रुग्ण ताटकळलेकोविड रुग्णालयात बेड फुल्ल झाल्याने तीन ते चार संशयित रुग्णांना ताटकळत कक्ष एकमध्येच थांबावे लागल्याचा व्हिडिओ मंगळवारी रात्री समोर आला़ रुग्णालयात संशयितांचे बेड फुल्ल झाले होते़ याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे़ यातील काही रुग्णांना आॅक्सिजन लावण्यात आले होते व नातेवाईक त्यांना हवा घालत होते़ एक महिला रुग्ण तळमळत असल्याचा हा व्हिडिओ आहे़ दरम्यान, या रुग्णांना नंतर तातडीने गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले़जिल्हाधिकाऱ्यांची रात्री कोविड रुग्णालयात पुन्हा पाहणीवाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाययोजना राबविल्या जात आहेत हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुन्हा एकदा सोमवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास अतिदक्षता विभागात रुग्णांची पाहणी केली़ एका दिवसात ९ मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर ऐवढे मृत्यू झाले कसे याबाबत जिल्हाधिकारी यांनी माहिती घेतली़ प्रत्येक रुग्णाजवळचे मॉनिटर्स तपासून आॅक्सिजन पातळीची त्यांनी पाहणी केली़ मृत्यूदर रोखण्यासंर्दभात त्यांनी सूचना दिल्या़ रुजू झाल्याच्या पंधरा दिवसात चौथ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पाहणी केली आहे़ त्यांच्यासोबत सर्व डॉक्टर्स उपसस्थित होते़
बाधित महिलेच्या मुलानेच घेतले रक्तनमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:57 AM