विद्यापीठातील घटना : अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोकाट कुत्र्यांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यात नीलगायीचा मृत्यू झाला. ही घटना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षक भवनाजवळ शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
विद्यापीठ परिसरातील हनुमान खोरे येथे वन्यजीवन संरक्षण संस्था, वृक्षसंवर्धन समितीच्या पुढाकाराने लोक सहभागातून बंधारे विकसित करण्यात आले आहे. विद्यापीठाने साठवण तलाव विकसित केले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या भागामध्ये वन्यजीवांचा वावर वाढला आहे. त्यात प्रामुख्याने मोर, नीलगाय, चिंकारा, ससे, कोल्हे, तडस, बिबट्या, उदमांजर, रानमांजर, रान डुक्कर सारखे वन्यजीवांचा मुक्त संचार आहे. गेल्या वर्षी बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने मोकाट कुत्रे कमी झाले होते. आता पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठाच्या शिक्षक भवन रस्त्यावरील दाट झाडीत नीलगाय बसलेली होती. तिच्यावर अचानक मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. भेदरलेली नीलगाय स्वतःची सुटका करत मुख्य रस्त्यावर धावत आली. ही घटना वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य अरुण सपकाळे यांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले. नीलगायीच्या मानेवर गंभीर जखमा झाल्याने ती अत्यवस्थ होती.
...अन् नीलगायीचा मृत्यू
नीलगाय गंभीर जखमी असल्यामुळे अरुण सपकाळे, विद्यापीठ कर्मचारी अशोक पाटील यांनी लागलीच वनविभाग आणि वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे याना उपचारासाठी संपर्क साधला. फालक यांनी घटनेची माहिती उपवन संरक्षक विवेक होशिंग यांना माहिती दिली. त्यांनीही वन कर्मचाऱ्यांना सूचना करीत घटनास्थळी पाठविले होते, परंतु गंभीर जखमी झालेल्या नीलगायीच्या अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला.