आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - १२ जुलै २०१४, ही तारीख आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा नामफलक लावून विद्यापीठाचे प्रतिकात्मक नामकरण करण्याची. हा फलक काढण्यात आला तरी आता तीन वर्षे, ८ महिने, १० दिवसांनी अखेर हेच नाव विद्यापीठाला मिळाले आणि हा फलक पुन्हा उभा राहण्याची अपेक्षा पूर्ती आता पुन्हा होणार आहे.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी लढा सुरू असताना १२ जुलै २०१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव असलेला फलक लावला. हा फलक काढण्यासाठी त्यांना सांगण्यातही आले. मात्र आपले आंदोलन सुरूच ठेवत प्रवेशद्वारासमोर उपोषण, भजन करीत कार्यकर्ते मागणीवर ठाम राहिले. यात विनोद देशमुख, मिलिंद सोनवणे, युगल जैन, मंगल पाटील, यशवंत पाटील, संजय राणा, मनिषा देशमुख, बापू देशमुख, प्रतिभा देशमुख, राजेंद्र देसले आदी सहभागी झाले होते.हा फलक तेथून काढून प्रवेशद्वाराच्या बाजूला ठेवण्यात आला होता. तेथून तो फलक नेण्याबाबत विद्यापीठाच्यावतीने कार्यकर्त्यांना कळविण्यातही आले. मात्र त्यांनी त्या वेळी सांगितले होते, ‘हा फलक तेथेच राहू द्या, एक दिवस तो सन्मानाने तेथे उभा राहील....’. आणि आता हा फलक तेथे उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला असून शुक्रवारी हेच पदाधिकारी, कार्यकर्ते तेथे जाऊन हा फलक उभा करणार आहे.
...अन् तो फलक पुन्हा सन्मानाने उभा राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:30 PM