९३० प्रतिबंधित क्षेत्र
जळगाव : जिल्ह्यात सद्यस्थिती ९३० प्रतिबंधित क्षेत्र सक्रिय असल्याची माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली आहे. एकत्रित ९,३४२ प्रतिबंधित क्षेत्र असून, त्यात ९३० सक्रिय आहेत. यात ग्रामीण भागात ४२१ तर शहरी भागात २६१ तर महापालिका क्षेत्रात २४८ झोन आहेत.
भडगावात कमी रुग्ण
जळगाव : जिल्हाभरातील सक्रिय रुग्णांमध्ये भडगाव तालुक्यात सद्यस्थितीत नऊ रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या सर्वात कमी असून चाळीसगाव तालुका वगळता अन्य सर्वच तालुक्यांमध्ये शंभरापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन आकडेवारी बघता बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे रुग्ण सध्या निरीक्षणाखाली असून त्यांच्या प्रकृतीनुसार याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. म्युकरची रुग्णसंख्या सद्यस्थितीत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
वॉर रूममध्ये कॉलच नाही
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थापन वॉर रूममध्ये गेल्या महिनाभरात बेड उपलब्धतेसंदर्भात एकही कॉल आला नसल्याची माहिती आहे. मध्यंतरी दिवसाला या ठिकाणी शंभर ते दीडशे कॉल येत असत, रुग्णसंख्या घटल्याने हे कॉलही बंद झाले आहेत.
सभा ऑफलाईनच
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा १० जुलैच्या आत घ्यायची असून, ही सभाही ऑफलाईनच होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत आता ५० टक्के उपस्थितीचे नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभांच्या निर्णयाकडे लक्ष राहणार आहे.