जळगाव,दि.9- प्रेमसंबधातून जन्माला आलेल्या बाळाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी तब्बल दहा महिन्यांनी उकरुन काढला. नायब तहसीलदारांच्याहस्ते पंचनामा करुन जागेवरच डॉक्टरांनी शवविच्छेदन केले, त्यानंतर हाडांचे नमुने घेवून ते डीएनए तपासणीसाठी मुंबई (सांताक्रुझ) येथील कलिना प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
यावल तालुक्यातील एक सतरा वर्षीय तरुणी शहराच्या उपनगर भागात नातेवाईकाकडे शिक्षणासाठी आलेली होती. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शाळेतीलच प्रवीण प्रभाकर तायडे (वय 22 रा.गोपाळपुरा, जळगाव) या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातून पीडित तरुणीने 25 जून 2016 रोजी एका बाळाला जन्म दिला. सात महिन्याची गर्भवती असल्याने तिचे सिङोरियन करण्यात आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार बाळ कुपोषित असल्याने पाच ते सहा दिवसातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रवीण याने नेरी नाका येथील स्मशानभूमीजवळील नाल्याजवळ एका खड्डय़ात बाळाला पुरले.
दरम्यान, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन प्रवीण तायडे याच्याविरुध्द 6 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्कार, बाललैंगिक अत्याचार व अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली.
पीडित मुलीचा जबाब व आरोपी तरुणाचे स्पष्टीकरण यात तफावत व आरोप-प्रत्यारोप झाल्याने जन्माला आलेल्या बाळाच्या मृतदेहाचे हाडाचे नमुने घेण्यात आले. दोन पंच यांच्यासमक्ष नायब तहसीलदार एल.एन.सातपुते यांनी शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजता नेरी नाका येथील नाल्याकाठी पुरलेल्या बाळाचा मृतदेह काढून इन्क्वेस्ट पंचनामा केला.