जळगाव : पाच दिवसापूर्वी तालुक्यातील भोकर येथून अपहरण झालेल्या रोहित नवल सैंदाणे (११) या बालकाचा मृतदेह सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता गावानजीकच्या मक्याच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. रोहित याचे शरीर फुगलेले, जीभ बाहेर आलेली, एका पायाचे कुत्र्याने लचके तोडलेले व अंगावर फक्त अंडरवियर होती. रोहित याचा घातपात झाल्याचा संशय आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी भोकर येथे श्रीराम श्यामराव सानेवणे यांच्या मुलाचे लाठी शाळेच्या आवारात लग्न होते. या लग्नात जेवण व पंगतीत वाढण्यासाठी रोहित दुपारी तीन वाजता घरुन गेला होता. सायंकाळी साडे पाच वाजता त्याने नवरदेवाला देखील वाढले. त्यानंतर तो गायब झाला. वडील नवल गुमन सैंदाणे सायंकाळी ६.३० वाजता घरी आले असता रोहित घरी नव्हता. नवल यांनी पत्नी सुनंदा यांना विचारणा केली असता तो घरीच आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वडील व इतर नातेवाईकांनी गावाच्या परिसरात रोहितचा शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली. कुठेच माहिती न मिळाल्याने गुमन सैंदाणे यांनी १३ रोजी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.दुचाकीवर बसवून नेणारे ते कोण?गावातील काही लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रोहीत याला दुचाकीवर बसवून नेले होते. ज्यांनी ही माहिती पोलिसांना दिली, त्यांच्या माहितीवरुन दोन संशयितांचे रेखाचित्रही पोलिसांनी जारी केले. दरम्यान, हे दोन जण कोण? असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. राहितचे अपहरण झाल्याच्या दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, तपासाधिकारी निशिकांत जोशी व वासुदेव मराठे यांचे पथक गेल्या चार दिवसापासून भोकर परिसरात जावून माहिती काढत होते. ही चौकशी सुरु असतानाच राजेंद्र शिवलाल सोनवणे (रा.भोकर, ह.मु.जळगाव) यांची शेती करणारे भगवान वामन सोनवणे यांना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता मरिमाता मंदिराच्या पाठीमागे मक्याच्या शेतात पायवाटेच्या बाजुला रोहितचा कुजलेला मृतदेह आढळून आला.
पाच दिवसापूर्वी अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 8:42 PM