अमळनेर : कोविड सेंटर मधून एक रुग्ण बेपत्ता झाला आणि काही वेळात त्याचा मृतदेह नागरपालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमळनेरात दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने जिल्हाधिकाºयांनी याबाबत गांभिर्याने दखल घेऊन तातडीने अहवाल मागवल्याची माहिती माजी आमदार स्मिता वाघ यांनी दिली.या खळबळजनक घटनेबाबत वृत्त असे की, सुनील दिलबर पाटील (वय ३२,रा. वावडे) हा आरोग्य विभागाने आयोजित शिबिरात स्वॅब घेतल्याने पॉझिटिव्ह आला होता. यामुळे ९ आॅगस्ट रोजी त्याला प्रताप महाविद्यालयात कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला थोडा जादा त्रास व हाताला जखम असल्याने तेथील अधिकाºयांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कक्षात उपचारासाठी पाठवले होते.दरम्यान ग्रामीण रुग्णालयात २० जणांची क्षमता असताना सुमारे ४० जणांवर उपचार करावे लागत असल्याने डॉक्टर आणि अधिकाºयांची तारांबळ उडत आहे. अशातच सकाळी सुनील पाटील ग्रामीण रुग्णालयात दिसला नाही म्हणून कर्मचारी व डॉक्टरांनी त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. त्याचे जवळचे नातेवाईक व फोन नंबर नोंद नसल्याने अडचण येत होती म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला जाऊन आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सुनील विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला रुग्ण जाणीव असतानाही पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सुनीलचा मृतदेह नागरपालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यांनतर शववाहिकेने ताबडतोब त्याचे शव उचलून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येऊन ती जागा सॅनिटाईझ करण्यात आली.दरम्यान यापूर्वी देखील बापू निंबा वाणी हा संशयित रुग्ण प्रताप महाविद्यालयातील क्वारंटाईन कक्षातून बेपत्ता झाला होता आणि नंतर त्याचा पारोळा तालुक्यात महामार्गावर अपघातात मृत्यू झाला होता. जळगाव नंतर अमळनेर तालुक्यात ही दुसरी घटना घडल्याने माजी आमदार स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान असाच प्रकार पुन्हा घडल्याने बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार वाघ यांनी केली आहे.
कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:10 PM