लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मृतदेह देताना तो प्लॅस्टिकच्या वेष्टणात न देता साध्या चादरीत गुंडाळून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
राणीचे बांबरुड ता. पाचोरा येथील मार्तंडराव देशमुख (वय ४६) यांचा रविवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना शहरातील श्रद्धा क्रिटिकल सेंटर या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांचा शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. त्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. मात्र त्यावेळी रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी वापरली जाणारी डेडबॉडी बॅग उपलब्ध नव्हती. रुग्णालयाने शोधाशोध करूनदेखील ही बॅग त्यांना मिळाली नाही. सर्जिकल विक्रीची दुकाने तसेच जवळच्या मेडिकल, काही ॲम्ब्युलन्स यांच्याकडे रुग्णालयाने बॅगची शोधाशोध केली. त्यानंतर अखेर सकाळी ९ वाजता मृतदेह साध्या चादरीत गुंडाळून नातेवाईकांच्या हवाली केला. त्यानंतर नातेवाईकांनी काही वेळाने त्यांच्यावर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
मार्तंडराव देशमुख यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई-वडील असा परिवार आहे. देशमुख यांच्या जळगाव शहरात राहणाऱ्या नातेवाईकांनीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र त्यांनी आपले नाव प्रसिद्ध करण्यास नकार दिला.
कोट -
सध्या जळगाव शहरात डेडबॉडी बॅग फारशा उपलब्ध नाहीत. आम्हाला वेळेवर ही बॅग मिळाली नाही. आम्ही बॅगसाठी काही सर्जिकल वस्तूंचे विक्रेते तसेच इतर मेडिकल चालकांना फोन केले. तसेच नातेवाईकांनीच मृतदेह नेण्याची घाई केली. आमची चूक आम्ही मान्य करतो.
- डॉ. मोहसीन शाह, श्रद्धा क्रिटिकल केअर
मृतदेह ताब्यात देताना तो योग्यप्रकारे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून देणे अपेक्षित होते. मात्र या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मृतदेह प्रोटोकॉलप्रमाणे न दिल्यास कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. तसेच जर त्यांना बॅग मिळाली नाही तर त्यांनी अशा अत्यावश्यक प्रसंगी शासकीय यंत्रणेकडे मदत मागायला हवी.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
कोरोना बाधिताचा मृतदेह चादरीत गुंडाळून दिल्याप्रकरणी स्वत: चौकशी करणार आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतांना योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. तसेच अत्यावश्यक प्रसंगी शासकीय यंत्रणेकडे मागणी केली जाऊ शकते. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक