संशयास्पद : अपघात की घातपात?
जळगाव : जळगाव खुर्द शिवारात महामार्गावर मुंजोबा मंदिरासमोरील रेल्वे रुळाच्या बाजूला शनिवारी २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघात आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना किमान दोन दिवस आधी झालेली असावी. रेल्वे रुळाला लागून असल्याने रेल्वेतून पडून मृत्यू झाला की काय, अशी शंका आहे. तर शरीरावरील जखमांवरून घातपाताचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असला तरी त्याच्या हातावर इंग्रजीतून एस, जान व एस.एम तसेच स्टार गोंदलेले आहे. चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झालेला आहे, वरून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची पाहणी केली. यावेळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन वाघचौरे व नशिराबाद पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.