जळगाव : शासनाकडून विविध योजनांतर्गंत निराधार लाभार्थ्यांना दरमहा वेतन दिले जाते. मात्र, शासनाच्या या योजनांचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा लाभार्थ्यांचा शासनातर्फे शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले असून, बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे निराधार योजनेच्या नावाखाली लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची आता खैर नसल्याचे दिसून येत आहे.
शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी योजनेंतर्गंत निराधार व्यक्तींना दरमहा एक हजारांचे वेतन थेट या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते. तसेच घटस्फोटित, विधवा, दिव्यांग, अनाथ व परितक्त्या आदी लाभार्थ्यांनाही संजय गांधी निराधार योजनेंतर्गतच वेतन दिले जाते. या लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून थेट त्यांच्या बॅंकेच्या खात्यावरच रक्कम जमा केली जात होती. या रकमेचा या निराधारांना मोठा हातभार लागत आहे. मात्र, अनेकजण बोगस लाभार्थी बनून शासनाची फसवणूक करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना गाव पातळीवर या बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित तहसील प्रशासनातर्फे ग्रामसेवक व तलाठ्यांना आदेश देऊन अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे.
कुठल्या योजनेचे किती लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना : ५६ हजार ९११
श्रावण बाळ योजना : ७७ हजार ८६
इंदिरा गांधी योजना : ८९ हजार ३३०
इन्फो :
दर महिन्याला याबाबत बैठक घेतली जाते. या बैठकीत जिल्ह्यातील तहसीलदारांना कुणी बोगस लाभार्थी निदर्शनास आल्यास तत्काळ चौकशी करून संबंधित लाभार्थ्यांने फसवणुकीने मिळवलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश आले आहेत. बोगस लाभार्थ्यांविरोधात प्रशासनाची कारवाई मोहीम सुरूच राहणार आहे.
- राहुल पाटील, निवासी जिल्हाधिकारी, जळगाव
इन्फो :
श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजना (विधवा)
जिल्ह्यात सध्या श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी ७७ हजार ८६ आहेत. तर संजय गांधी योजना (विधवा) योजनेचे लाभार्थी ५६ हजार ९११ इतके आहेत.
इन्फो :
संजय गांधी योजना (घटस्फोटित)
शासनातर्फे संजय गांधी योजनेंतर्गंत घटस्फोट झालेल्या महिलानांही इतर लाभार्थ्यांप्रमाणे दरमहा एक हजारांचे वेतन दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात एकूण घटस्फोटित लाभार्थी महिलांची आकडेवारी स्वतंत्र नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
संजय गांधी योजना (दिव्यांग)
शासनातर्फे संजय गांधी योजनेंतर्गंत दिव्यांग बांधवांनाही इतर लाभार्थ्यांप्रमाणे वेतन दिले जाते. त्यांचेही वेतन थेट बॅंकेच्या खात्यात जमा होत आहे.
इन्फो :
संजय गांधी योजना (अनाथ)
शासनातर्फे संजय गांधी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील अनाथ बांधवांनाही दरमहा एक हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यातील या लाभार्थ्यांच्या यादीतच अनाथ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
इनफो :
संजय गांधी योजना (परितक्त्या)
शासनातर्फे परितक्त्या लाभार्थ्यांनाही दरमहा एक हजारांचे आर्थिक सहाय्य दिले जात आहे. या लाभार्थ्यांचे वेतन दरमहा थेट त्यांच्या बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.