जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून, जळगाव बाजार समितीसाठी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर मतदान सुरु आहे. या दरम्यान शिंदे गटाकडून बोगस मतदान करण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-मापाडी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार, देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे यांनी केला. यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. उमेदवारांनी थेट मतदान केंद्रात जावून राडा घातला. तसेच मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या वादात मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला.
दरम्यान, जळगाव बाजार समितीसाठी जळगाव शहरासह कानळदा, सावखेडा, उमाळा व वावडदा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होते.