लोकमत न्यूज नेटवर्कमहिंदळे, ता. भडगाव: परिसरावर पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच आभाळमाया दमदार बरसलीच नाही. परिसरात पावसाची सुरुवातच तुरळक झाली. त्यामुळे पेरणीही उशिरा झाली. काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी कपाशी लागवड केली होती. पिकेही जोमदार होती. परंतु अचानक परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले व माल पक्व होण्याच्या काळातच कपाशी लाल पडायला लागली आहे. या लाल्या व बोंड अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखे झाले आहे. कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.शेतकºयांनी पिकांसाठी मोठा खर्च केला आहे. परंतु कपाशीच्या माल पक्व होण्यास सुरुवात होत असतांना वातावरणाच्या बदलामुळे कपाशी पिकावर बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव होत फुल पाती गडून पडली आहेत. परिणामी झाडांवर फुलपाती कमी व पानेच जास्त दिसत आहेत. आता अचानक उन्हाची तीव्रता व वातावरणात बदल झाल्यामुळे कपाशी पिके लाल पडण्यास सुरुवात झाली आहे.झाडावर पाहिजे तेवढा माल पक्व झाला नसल्यामुळे अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकरी पार खचला आहे. पिकांसाठी केलेला खर्चही निघणे आता मुश्किल झाले आहे.परिसरात पावसाळा संपण्याच्या मार्गांवर आहे. पण अजूनही दमदार पाऊस आलाच नाही. त्यामुळे परिसरातील पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पिकांना पाण्याची गरज आहे.परंतु विहिरीत पाण्याचा साठाच नसल्यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे या विवनचनेत शेतकरी सापडला आहे.
कपाशीवर बोंड अळीचेही आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 3:28 PM