जळगाव : पुस्तके ही प्राणवायूसारखी असतात, जसा जगायला ऑक्सिजन लागतो तशीच पुस्तकंही लागली पाहिजेत कारण पुस्तक वाचणाऱ्या माणसाला प्रश्न पडतात, तो विचार करायला लागतो आणि विचार करणारा माणूस हा खऱ्या अर्थाने जिवंत माणूस असतो, असे विचार मराठीतील सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले. ‘परिवर्तन पुस्तक भिशी’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हरवलेले लेकरू परत सापडावे, त्यावेळी आईला जो आनंद होतो, तो आनंद मला पुस्तक पुन्हा हातात घेताना होतो.
वाचनाची एक पद्धत असते, पुस्तकांची निवडही योग्य असायला हवी, असे दासू वैद्य यांनी यावेळी सांगितले. परिवर्तन तर्फे ‘पुस्तक भिशी’ या उपक्रमात भिशींची संख्या पाच झाली आहे. यात कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, शेगाव यासह महाराष्ट्रातील विविध भागातील वाचक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमात सुरवातीला उदय सपकाळे, जयश्री पाटील व शंभू पाटील या वाचकांनी गेल्या महिन्यात भिशीतून घेतलेल्या पुस्तकांवर मनोगत व्यक्त केले. आयोजनासाठी पुस्तक भिशीचे प्रमुख मंजूषा भिडे व ज्ञानेश्वर शेंडे, प्रा मनोज पाटील, अविरत पाटील यांनी सहकार्य केले.