विजयकुमार सैतवालजळगाव : दिवाळीच्या विविध मुहूर्तावर जळगाव येथे सोने खरेदीसाठी मोठी गर्दी होऊन करोडो रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवापासून सुरू असलेली सुवर्णखरेदी अद्यापही सुरूच आहे. वसू बारस ते भाऊबीज दररोज ग्राहकांनी वेगवेगळे मुहूर्त साधल्याने दिवाळीच्या पर्वात ‘सुवर्णनगरी’ गजबजून गेली. या सोबतच वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड बाजारातही मोठी गर्दी होऊन घर खरेदीसही चांगला प्रतिसाद मिळाला. या उत्सवातील बाजारपेठेतील उलाढाल १८० कोटी रुपयांवर गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे देशभर मंदी असल्याचे सांगितले जात असताना दिवाळीच्या मोठ्या उलाढालीने बाजारपेठेला बुस्टर डोसच दिला आहे.जळगावातील सोने देशभर प्रसिद्ध असल्याने येथे तशी नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. यंदा नवरात्रोत्सवापासून शहरातील सुवर्ण पेढी गजबजून गेल्या आहेत. तेव्हापासून अद्यापही सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी कायम आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीस मोठा वेग आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही गर्दी कायम होती. त्यापाठोपाठ रविवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सलग तिसºया दिवशी गर्दीत आणखी भर पडली. या दिवशी देखील अनेक जण सोने खरेदीला महत्त्व देतात. याच दिवशी सोने खरेदी करीत संध्याकाळी त्यांचे पूजन केले जाते. रविवार असला तरी शहरातील सुवर्णपेढ्या खुल्या होत्या.सोने व्यवसायातील एकूण विक्रीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नसला तरी शहरातील १५०च्यावर असलेल्या सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीच्या हंगामात ६५ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दुचाकी व चारचाकींना मोठी मागणी राहिली. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ७०० पेक्षा जास्त दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरातील एकाच दालनात रविवारी संध्याकाळपर्यंत ४०० दुचाकींची विक्री झाली होती. दीपोत्सव काळात १४०० दुचाकींची विक्री होऊन यात जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. चारचाकींची विक्रीदेखील तेजीत आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर १०० चारचाकींची विक्री झाली. या हंगामात ४००चारचाकी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. यात एकाच दालनात २०० चारचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारातदेखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एलईडीला सर्वात जास्त मागणी असून त्या खालोखाल फ्रीज व वॉशिंगमशीनला मागणी राहिली. सोबतच एसी, मोबाईल यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामध्ये जवळपास १५ कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या काळात जवळपास ४०० जणांनी घराची खरेदी केली. घर खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ््या साईटची पाहणी केली जात होती. यासाठी कुटुंबासह अनेकजण येऊन शाळा, महाविद्यालय व इतर सोयींचा विचार करीत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार व घराची किंमत पाहून नवीन घराची खरेदी केली. यातून जवळपास ६० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.सण-उत्सव म्हटले म्हणजे प्रत्येक जण नवीन कपडे खरेदीला पसंती देत असतो. त्यानुसार दिवाळीसाठीदेखील मोठ्या प्रमाणात नवीन कपड्यांची खरेदी होऊन जवळपास १० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. तसेच फटाके व पुजेचे साहित्य, फराळ आदीची खरेदी सुमारे ५ कोटींची झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीने बाजारपेठेला ‘बुस्टर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:23 PM