बोदवड : गेल्या २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला होता. एक- दोन वेळेचा रिमझिम पावसाचा अपवाद वगळता पाऊस नसल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी ही धोक्यात आली होती. परिणामी पूर्ण बाजरपेठेवर मंदीचे सावट पावसाने पडले होते. अशात १० रोजी रात्री पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिकांना जणू बुस्टरडोस मिळाला आहे.
१० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या तसेच रात्री दोन वाजेपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने गैरसोय झाली, मात्र २८ जून नंतर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे.
बोदवड शहरासह नाडगाव, वरखेड, एनगाव, शेलवड असा चौफेर पाऊस तब्बल अर्धातास पडला. त्यामुळे संपूर्ण रस्ते वाहून निघाले, तर या पावसाने काहींच्या शेतात डबके तयार झाले आहे. समाधानकारक पावसाने रविवारी सकाळपासून शेतकरी वर्ग शेतात काही ठिकाणी बियाणे टोचताना व इतर कामांच्या धावपळीत दिसला.
बोदवड तालुका
दिनांक ११ जुलै रोजीचा मंडळनिहाय अहवाल.
पाऊस आकडेवारी मि.मी.मध्ये.
बोदवड - १८
नाडगाव -२०
करंजी -००
......................................
एकूण- ३८
सरासरी- १२
प्रोग्रेसिव्ह सरासरी- ११२.२