पहूर, ता, जामनेर : औरंगाबाद -जळगाव महामार्गावर गेल्या महिन्यात सराफा व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी मध्यरात्री दोन जणांना अटक केली असून यात पहूर येथील दोन युवकांचा समावेश आहे. अन्य चार जणांचा एलसीबीचे पथक शोध घेत आहे. या घटनेत अज्ञात सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.वाकोद येथील रहिवासी कमलेश किशोर छाजेड यांचे पहूर येथे सराफा दुकान आहे. मागील महिन्यात संध्याकाळी दुकान बंद करून आपल्या सहकाऱ्यासह वाकोदकडे दुचाकीने जात असताना पहूर गावापासून दोन कि.मी.अतंरावरील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात सहा जणांनी कमलेश व त्यांच्या सहकाºयावर प्राणघातक हल्ला करून ९५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होते. कमलेश छाजेड यांच्या सहकाºयाचा मोबाईल याघटनेत चोरीला गेला होता. या मोबाईलच्या लोकेशनवरून या घटनेचा एलसीबीने माग काढत तपासाची चक्रे फिरविली.सोमवारी एलसीबीच्या पथकाने पहूर येथील प्रदीप रायदास पाटील (२३) व रोहित दीपक पाटील (१९) रा.पहूर पेठ या युवकांच्या हालचांलीवर लक्ष ठेवले. रात्री या दोघांना ताब्यात घेऊन पहूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मध्यरात्री दोन वाजता दोघांना अटक करण्यात आली.या घटनेत एकूण सहा जणांविरुद्ध पहूर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य चार जणांचा एलसीबी शोध घेत आहे. पहूरमधील या युवकांच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे.सराफ व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यानंतर महिनाभरातच पुन्हा पहूर येथे बंदुकीचा धाख दाखवून सहा लाखाची जबरी चोरीची घटना घडली. या घटनेच्याही मुळाशी पहूर पोलीस गेले असून काही दिवसातच चोरट्यांना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सराफ व्यावसायिकावरील हल्लाप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:18 AM