चाळीसगाव : वटपौर्णिमा झाली की, चाळीसगावच्या पंचक्रोशीतील समस्त वारकऱ्यांना दिंडीतून पंढरपूरकडे पायी वारीने मार्गस्थ होण्याचे वेध लागतात. यंदाही कोरोनाचा विळखा घट्ट असल्याने सिद्धेश्वर आश्रमातून निघणारी ह.भ.प. ज्ञानेश्वर माउलींसह शिवाजी चौकातून निघणाऱ्या ह.भ.प. कृष्णा महाराज यांच्या दिंड्यांचे प्रस्थान यंदाही होणार नाही.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर माउलींनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. चाळीसगावात पायी वारीची पताका ८० वर्षांपूर्वी ह.भ.प. मोतीराम महाराज यांनी रोवली. आपल्या आठ ते दहा सहकाऱ्यांसह ते नित्यनेमाने दरवर्षी पांडुरंगाच्या भेटीला पायी वारीने जात. वटपौर्णिमेनंतर त्यांच्या दिंडीचे चाळीसगावातूनच प्रस्थान व्हायचे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र ह.भ.प. कृष्णा महाराज यांनी ही परंपरा पुढे नेली आहे.
कृष्णा महाराज गेल्या १५ वर्षांपासून दीडशे वारकऱ्यांसोबत मजल-दरमजल करीत पंढरपूरला जातात. वारीमार्गात विठू माउलीचा जयघोष करीत ते वैकुंठनगरी गाठतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांच्या पायी वारीला प्रशासनाने परवानगी नाकारली. यंदाही कोरोनाचा उद्रेक पाहता त्यांच्या दिंडीचे प्रस्थान झालेले नाही.
सिद्धेश्वर आश्रमात दोन हजार वैष्णवांचा सहभाग
ज्ञानोबा माउली-तुकोबांचा गजर करीत बेलदारवाडीस्थित सिद्धेश्वर आश्रमातून गेल्या २७ वर्षांपासून ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली पायी दिंडी काढतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे त्यांचीही दिंडी पंढरीकडे कूच करू शकली नाही. वारीच्या सुरुवातीलाच ८०० वारकरी सहभागी होतात. पुढे यात दोन हजारांहून अधिक वैष्णव सहभागी होऊन विठू माउलीचा गजर करीत पंढरी पाहण्याचे सुख अनुभवतात. गेल्या दोन वर्षांपासून या भक्ती सोहळ्यात कोरोनाने बाधा आणली आहे. यंदाही साथरोग पसरू नये. यासाठी दिंडी न काढण्याचा निर्णय ज्ञानेश्वर माउलींनी घेतला आहे.
कोरोना आटोक्यात आला असेल, तर आम्हाला दिंडीद्वारे पंढरपूरला जाऊ द्यावे. मात्र, संक्रमणाची स्थिती अजूनही सुधारत नसेल, तर आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. वारीचा मूळ उद्देशच कुणालाही इजा न होता भक्तिभाव जोपासणे हा आहे.
-ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली
ह.भ.प. कृष्णा महाराज,
चाळीसगाव