- कुंदन पाटील
जळगाव : पहूर कसबे येथील इंदिरा विश्वनाथ वानखेडे व अमळनेर येथील जयश्री साळुंखे यांचा जिल्हाधिकारी व जि.प.सीईओंच्याहस्ते अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कोविडमुळे अनाथ झालेल्या पालकांच्या नावे असलेल्या ५ लाखांच्या ठेव प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमन मित्तल होते. जि.प.सीईओ पंकज आशिया, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार, सदस्य संदीप पाटील, वृशाली जोशी, वैशाली विसपुते, विद्या बोरनारे आदी उपस्थित होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनीता सोनगत यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (२०१३-१४) प्राप्त. इंदिरा विश्वनाथ वानखेडे (रा.पहूर कसबे ता.जामनेर) व २०१४-१५ च्या पुरस्कारार्थी जयश्री साळुंखे (अमळनेर) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर कोविडमुळे अनाथ झालेल्या १२ पालकांना राज्य शासनाच्या ५ लाखांच्या मुदतठेव योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
सूत्रसंचालन सारिका मेतकर यांनी केले. जिल्हा परीविक्षा अधिकारी एस.आर.पाटील, अधीक्षक आर.पी. पाटील, परीविक्षा अधिकारीमहेंद्र पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार, निरीक्षण गृहाच्या जयश्री पाटील, रविकिरण अहिरराव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.