जळगाव : आत्महत्या करायला गेला, मात्र रेल्वे येताच विचार बदलला. रुळावरून सरकण्याच्या तयारीत दोन्ही पायांवरून रेल्वेगाडी गेली. त्यात त्याचे दोन्ही पाय कापले गेले. समोरच पायाचे तुकडे पाहून तो बसून उठला. ही घटना समजल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागून येणारी रेल्वे मालगाडी थांबवून त्यातून रुग्णालयात आणण्यात आले, मात्र तत्पूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मण दौलत महाजन (वय ४० रा. हरिविठ्ठल नगर) असे या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान, लक्ष्मण याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी दुपारी ४ वाजता तो घराच्या बाहेर पडला. सायंकाळी ५ वाजता गिरणा पंपिंग परिसरात रुळावर झोपला. रेल्वे येत असल्याचे दिसल्यावर आत्महत्येचा विचार बदलला. मात्र उठून बाजूला होणार तोच त्याचे दोन्ही पाय व डाव्या हाताचे मनगट कापले जाऊन गंभीर दुखापत झाली. डोळ्यासमोरच पायाचे तुकडे तो उठून बसून पाहत होता. लोहमार्गचे पोलीस अमलदार समाधान कंखरे व अनिल नायडू यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर नातेवाईक विनोद माळी व मित्र संतोष पाटील, दिनेश बारी हे देखील तेथे पोहोचले. तेथून त्याला रुग्णालयात आणण्यासाठी लवकर वाहन मिळाले नाही. त्यामुळे रेल्वे मालगाडीत लक्ष्मणला हलविण्यात आले. मात्र बजरंग बोगद्याजवळ लक्ष्मणची प्राणज्योत मालवली. रेल्वेस्थानकावर रुग्णवाहिका बोलावून त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल कळस्कर यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात हलविले. लक्ष्मणच्या पश्चात पत्नी ज्योती व दोन मुले राज, छकुली तसेच दोन भाऊ योगेश व दीपक असा परिवार आहे. आई व वडिलांचे निधन झालेले आहे. लक्ष्मण हा रामानंदनगर परिसरात नाश्त्याची गाडी लावून कुटुंबांचा उदनिर्वाह भागवित होता.