कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी : नागरिकांची मध्यंतरी मिळेल त्या लसीला होती पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन लसीपेक्षा कोविशिल्ड लसीलाच नागरिकांनी पसंती दिल्याचे शिवाय या लसीचा मर्यादित पुरवठा होत असल्याने जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे लसीकरण अधिक झाले आहे. एकीकडे कोविशिल्ड लसीचे एकूण ६२५०८६ नागरिकांनी डोस घेतलेले असताना कोव्हॅक्सिनचे केवळ ७६५३७ नागरिकांनी डोस घेतले आहे. दरम्यान, मध्यंतरी मिळेल ती लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.
जिल्हाभरात लसीकरणासाठी केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे, त्यामुळे आता लसीकरण मोहीमेला अधिक गती आली आहे. त्याच दोन टप्प्यात आता १८ ते ४४ वयोगटाचेही लसीकरण सुरू झाले आहे. सुरूवातीचे दोन महिने लसीकरणाला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, कोविडचे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढल्यानंतर शिवाय सामान्यांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. त्यातच केंद्रांची संख्या मर्यादीत असल्याने केंद्रांना अगदी गर्दीचे स्वरूप आले होते. या लसीकरण मोहिमेत सुरूवातीपासून जिल्ह्याला कोविशिल्डचा पुरवठा अधिक प्रमाणात झाला आहे.
कोविशिल्डच का?
जिल्ह्यात सुरूवातीचे दोन महिने कोव्हॅक्सिनचा जिल्हाभरात पुरवठाच नव्हता. त्यानंतर ही लस उपलब्ध झाल्यानंतर ज्यांनी पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतला होता. त्यांना दुसरा डोस मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. या लसचा मध्यंतरी पुरवठाच नसल्याने अनेकांचे दुसरे डोस लांबले होते. केंद्रावर अगदी हाणामारीपर्यंत वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यंत मर्यादीत असल्याने आता केवळ दुसर्या डोससाठीच हा साठा वापरला जातो. शिवाय परदेशी प्रवासात आलेल्या मर्यादा यामुळेही कोविशिल्ड लसीचे अधिक लसीकरण जिल्हाभरात झाले आहे.
एकूण लसीकरण
कोविशिल्ड : ६२५०८६
कोव्हॅक्सिन : ७६५३७
कोविशिल्ड
आरोग्य कर्मचारी : पहिला डोस २९२७५, दुसरा डोस १८६६९
फ्रंट लाईन वर्कर्स : पहिला डोस ५९६७१, दुसरा डोस १८६३६
१८ ते ४५ वयोगट पहिला डोस ३४१४२, दुसरा डोस ००
४५ ते ६० पहिला डोस १९३०६७, दुसरा डोस २३००८
६० वर्षा पुढील : पहिला डोस १८८३६१, दुसरा डोस ५४२०७
कोव्हॅक्सिन
आरोग्य कर्मचारी : पहिला डोस ७४४, दुसरा डोस ५९२
फ्रंट लाईन वर्कर्स : पहिला डोस २९२८, दुसरा डोस २४६१
१८ ते ४५ वयोगट : पहिला डोस १४३६७, दुसरा डोस ८५८४
४५ ते ६० : पहिला डोस १३०४६, दुसरा डोस ९६३७
६० वर्षा पुढील : पहिला डोस १३५५३, दुसरा डोस १०१२५
कोट
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सुरूवातीपासून कोविशिल्ड लसीचाच आपल्या जिल्ह्यात अधिक पुरवठा झाला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेणार्यांची संख्या ही कमी आहे. मात्र, दोन्ही लस या सारख्याच परिणामकारक आहे. निकषात बसणार्या नागरिकांनी लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक