फोटो
जळगाव : कौटुंबिक वादात घरासमोर राहणाऱ्या शेरु याने घरी येऊन सागर पंडित शिंदे (वय २७) या तरुणाच्या डोक्यात दारुची बाटली फोडून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता गेंदालाल मिल भागात घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पंडित शिंदे हा तरुण आई, पत्नी व मुलीसह गेंदालाल मिल भागात वास्तव्याला आहे. घरात किरकोळ वाद असल्यामुळे सागर शिंदे हा त्याच्या घरात बडबड करत होता. दुपारी १ वाजता घरासमोर राहणारा शेरु (पूर्ण नाव माहीत नाही) हा त्याच्या घरी आला व लाथ मारुन दरवाजा तोडला. घरात अनधिकृतपणे प्रवेश करून गल्लीत शिवीगाळ का करतो असे बोलून सागर शिंदेला शिवीगाळ केली. हातातील दारुची बाटली सागरच्या डोक्यात हाणली. यात सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत सागर शिंदे थेट शहर पोलीस ठाण्यात आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी पाठविले. प्राथमिक उपचार घेऊन सागर शिंदे याने शेरुविरुद्ध तक्रार दिली.