दत्तात्रेय पाटील -
जळगाव : यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात बुडून बालिकेसह मुलाचा मृत्यू झाला. गुरे चारण्यासाठी गेलेली बालिका पाय घसरुन धरणाच्या पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलाचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
निमा किसन बारेला (९ ) आणि आसाराम शांदीलाल बारेला (१४, दोघे रा. निमछाव पाडा, ता. यावल) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निमा ही मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी निंबादेवी धरण परिसरात गेली होती. त्यावेळी ती पाय घसरुन पाण्यात पडली. त्याचवेळी आसाराम आणि त्याचे चार मित्र पोहण्यासाठी आले होते. आसाराम याच्या लक्षात हा प्रकार येताच तो निमा हिला वाचविण्यासाठी गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने निमासोबत तोही बुडाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आसाराम याचा तर बुधवारी सकाळी निमा हिचा याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आसाराम हा वाघझिरा आश्रम शाळेत नववीत तर निमा बारेलाही निमछाव पाडा येथील प्राथमिक शाळेतच इयत्ता चौथीत शिकत होती. यावल ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.