लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात अनेक लहान-मोठे व्यापारी आहेत. ते अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या किरकोळ वस्तूंची विक्री करतात. मोबाईल रिपेअरिंगची कामे करतात. मात्र गेल्या वर्षभरात चारच महिने त्यांची दुकाने सुरू राहिली आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा शासनाने ब्रेक द चेन या अंतर्गत कडक निर्बंधाची घोषणा केली त्यातूनही अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांच्या व्यवसायावर वर्षभराचा खर्च करावा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.
गेल्या मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाऊन लागला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत दुकाने बंदच होती. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेसाठी
असलेली दुकाने सुरू होती. त्यामुळे व्यापारी मेटाकुटीला आले होते. अनेकांनी असलेली शिल्लक याच काळात वापरली. त्यानंतर नोव्हेंबर ते मार्च
या महिन्यांमध्ये व्यवसाय सुरू झाला. मात्र सहा महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे व्यापारावर
परिणाम होतच होता. सुरळीत होत आहे असे वाटेपर्यंत पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आणि कडक निर्बंधांच्या नावाखाली सरकारने लॉकडाऊन लावले. चार महिन्यांच्या उत्पन्नात कर्ज कसे फेडावे, व्यापारी असले तरी दुकान भाडे, व्यापारासाठी केलेली कर्जाची उचल, घराचे हप्ते हे कसे फेडावे, असे प्रश्न व्यापाऱ्यांना पडले आहेत. प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी बँका काही कर्जात सूट देत नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा घरखर्च चालणार तरी कसा, असा प्रश्न पडला आहे.
कोट
घर चालवावे कसे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाच्या आधीच्या काळात उत्पन्न चांगले होते. पण नंतर संपूर्ण कुटुंबच अडचणीत आले आहे. दुकान भाडे, घर भाडे आणि इतर कर्जाच्या रकमा परत कशा करायच्या आणि त्यानंतर उरलेल्या रकमेतून घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न आता पडला आहे. - भाग्यश्री माहुरकर, गृहिणी
कोरोनाच्या काळात मागील वर्षी दुकाने बंद राहिली होती. त्या काळात उत्पन्न पूर्ण थांबले होते. आता पुन्हा निर्बंध लादल्याने घरात होणारा
खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे - दिव्या वाणी