श्यामकांत सराफ / ऑनलाइन लोकमतपाचोरा, जळगाव, दि. 19 - तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि पाचोरा - भडगाव तालुक्याचा केंद्रबिंदू असलेले तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि देऊळांचे नगर म्हणून प्रसिद्ध असलेले नगरदेवळा गाव विकासासाठी पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी दत्तक घेतलेआहे. येथे विविध कामे सुरू असली तरी ख:या विकासासाठी वाढीव निधीची गरज आहे.नगरदेवळा हे गाव तालुक्यात मोठे असले तरी विकास कामे हवी तशी झालेली नाही. या गावी पवार घराण्याचे संस्थान होते. श्रीमंत सरदार शिवराव पवार यांना ब्रिटिश सरकारने नगरदेवळा व परिसरातील 18 गावांची जहांगिरी, महसुली दिली होती. हे गाव आमदार किशोर पाटील यांनी दत्तक घेतले. 15 हजारांवर लोकसंख्या असलेल्या या गावात सर्व समाजाचे वास्तव्य असून चार हजार 525 कुटुंबाचे हे गाव आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणाहून अग्नावती नदी वाहते. या नदीवर अग्नावती मध्यम प्रकल्प बांधून पूर्वीच पाणी अडविल्याने नदीमध्येच बाजारपेठ सुरू झाली. अतिक्रमणामुळे नदीच नष्ट होऊन तेथे व्यवहार व्यापार होऊ लागले यामुळे गावाचे दोन भाग पडले. लोकसंख्या जास्त त्यात पंचक्रोशीतील 20 गावे लागून यामुळे मोठी बाजारपेठ असल्याने प्रवाशांची सतत वर्दळ असते. मात्र येथे बसस्थानक नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागतो. अग्नावती मध्यम प्रकल्प गावालगत आहे. मात्र पाण्यासाठी नागरिकांना ससेहोलपट करावी लागते. पाण्याचा नेहमीच ठणठणाट जाणवतो. गावामध्ये एलईडी बल्ब, स्ट्रीट लाईट लावल्याने झगमगाट झाला. काही दिवसांपूर्वीच आमदार निधीतून नवीन वस्तीत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले.या सोबतच इतरही कामे करण्यात आली असून बरीच कामे प्रस्तावित आहे. राज्य सरकारने दत्तक गाव घेण्याचे सांगितले. मात्र त्यासाठी वेगळा निधी ठरविला नाही. आमदार फंड हा संपूर्ण मतदारसंघासाठी असतो. नगरदेवळा गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गावचे सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रा.पं. सदस्य, संस्थांचे संस्था चालक यांची एकत्रित बैठक घेऊन गावचा विकास करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात असून रस्ते, गटार, पाणीपुरवठा, दिवाबत्ती याकडे प्रामुख्याने लक्ष असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
वाढीव निधी अभावी नगरदेवळ्य़ाच्या विकास कामांना ‘ब्रेक’
By admin | Published: May 19, 2017 4:55 PM