जळगाव : आरटीई योजनेचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी जिल्हा परिषदेला अनुकूल अहवाल पाठविण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच घेतांना धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे (वय ५७,रा.अमळनेर) व कंत्राटी शिक्षक तुळशीराम भगवान सैंदाणे (वय ३४,रा.चोपडा)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी बिऱ्हाडे यांच्या दालनातच दोघांना पकडण्यात आले असून त्यांना अटकही करण्यात आली.
तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी येथे शाळा आहे. या शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून २०१६ पासून स्वयं अर्थ सहाय्यता या तत्वावर चालविली जात आहे. शासनाच्या आरटीई योजनेप्रमाणे २५ टक्के विद्यार्थी शाळेत भरावयाचे असतात. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थामागे ८ हजार रुपये वार्षिक अनुदान मंजुर करत असते. या शाळेतील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आरटीई अंतर्गत शाळेत १७ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून ८ हजार याप्रमाणे १७ विद्यार्थ्यांचे १ लाख ३६ हजार रुपये अनुदानाची रक्कम झालेली आहे. हे अनुदान मंजूर होण्यासाठीचा अनुकूल अहवाल तयार करुन जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठवून देण्याच्या मोबदल्यात गटशिक्षणाधिकारी बिऱ्हाटेने ३० डिसेंबर रोजी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत संस्थाचालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
दालनातच लावला सापळाउपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी धरणगाव पंचायत समितीत सापळा लावला. बिऱ्हाडे यांच्या दालनातच त्यांच्यासाठी सैंदाणे याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी,सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.