स्टार ७५६
सुनील पाटील
जळगाव : कोरोनामुळे जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरु आहे, त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य आहे. त्याशिवाय बाहेरील सामान्य व्यक्तीनाही अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश बंदी करण्यात आली आहे, असे असले तरी या महामारीत लाचखोरी जोरातच राहिली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना काळातही २० अधिकारी, कर्मचारी अर्थात लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यात सर्वाधिक ८ जण महसूलचे तर त्याखालोखाल पोलीस विभागाच्या ५ जणांचा समावेश आहे.
यावर्षी नाशिक विभागात जळगाव लाचखोरीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यापासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव जळगावात वेगाने वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे शासकीय कामकाजही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही रोडावली.
शिथिलतेनंतर भ्रष्टाचारात होते वाढ
जळगावसह नाशिक विभागात पाच जिल्ह्यांत वर्षभरात शंभर सापळे यशस्वी ठरले, तर अपसंपदेप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले. या विभागात एकूण १०४ गुन्हे गेल्यावर्षी दाखल झाले. मागीलवर्षी लॉकडाऊन शिथिल होताच शासकीय कार्यालयांमधील कामकाजाची गाडी रुळावर आली आणि काही लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसून आले होते. यंदाही मागील वर्षाप्रमाणेच सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक विभागातील पाच जिल्ह्यात एकूण ५४ सापळा कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ७२ संशयित लोकसेवकांना अटक करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक विभागाने सापळा कारवाईचे शतक पूर्ण केले होते.
गेल्या वर्षातील विभागनिहाय सापळे असे...
महसूल-८
पोलीस-५
जिल्हा परिषद -२
बीएसएनएल-१
महावितरण-१
मनपा/नपा -१
जमाबंदी-१
सहकार-१
वनविभाग -
वर्षनिहाय कारवाया
(जळगाव विभाग)
२०१८-३०
२०१९- ३१
२०२०-२०
कोट
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लाचखोरीच्या तक्रारी कमी आलेल्या असल्या तरी कोरोनाच्या महामारीतही लाचखोरी सुरुच आहे. महसूल व पोलीस हे दोन विभागच नेहमी लाचखोरीत सर्वात पुढे असतात.
गोपाल ठाकूर - उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग